PM मोदींनी सफाई कामगारांचे पाय धुवून जी ‘मानवता’ दाखवली होती ती आता संपली आहे : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे प्रवासी कामगारांना होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी रविवारी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून जी मानवता दाखवली होती, ती आता समाप्त होताना दिसत आहे. असे त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये त्यांच्या एका लेखात म्हटले. प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदींनी सफाई कर्मचार्‍यांचे पाय धुतले होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत चार सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून आपल्याला मानवता दर्शविली होती. परंतु सध्या गेल्या तीन महिन्यांत ही माणुसकी संपली आहे असे दिसते. राऊत म्हणाले, काश्मिरी पंडितांना त्यांची घरे सोडून आणि आपल्याच देशात निर्वासितांसारखे रहाण्यास भाग पाडण्याच्या विषयावर अनेकदा राजकारण केले गेले आहे. आज सुमारे 6 कोटी स्थलांतरित कामगारांना त्यांच्यासारखेच जीवन जगण्यास भाग पडले आहे.

राऊत म्हणाले की, हिटलरचा अमानुषपणा आणि यहुद्यांप्रती त्याच्या व्यवहारावर नाराज होणाऱ्या लोकांना सांगितले पाहिजे की त्यांनी या स्थलांतरित कामगारांसाठी काय केले? जर सर्व राज्यांतील सत्ताधारी सरकार या स्थलांतरित कामगारांच्या दु:खावर विचलित झाले नसतील तर या कोरोना विषाणूमुळे मानवतेचा अंत झाला आहे असे समजण्यास हरकत नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याऐवजी राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांची वारंवार भेट घेण्याच्या भाजप नेत्यांच्या हेतूवर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात विरोधक वारंवार दावा करत आहेत की ठाकरे सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी हे विसरू नये की उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील सरकार कोरोना विषाणूची प्रकरणे आटोक्यात आणण्यास सर्वाधिक अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे गुजरातचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना या जबाबदाऱ्यांपासून पळता येणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like