संजय राऊतच ‘दम बिर्याणी’चे ‘जनक’, मनसेकडून खोचक ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सध्या वादात सापडले आहेत. त्यांनी ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबद्दल आवाज उठवल्याबद्दल आणि इंदिरा गांधींसंदर्भात वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील मित्र पक्ष देखील त्यांच्यावर टीका करत आहेत. संजय राऊतांनी यासंबंधी दुपारी भाष्य करत आपले वक्तव्य मागे देखील घेतले. परंतु वाद शमण्याचे नाव घेत नाही. यात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेकडून राऊतांवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे.

मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की संजय राऊत हे खूप महान आहेत, त्यांनी दाऊद इब्राइमला दम देखील भरला आहे, उद्या ते इराण-अमेरिकामध्येदेखील मध्यस्थी करु शकतात. संजय राऊत यांनी जो दम दिला त्यावरुनच दम बिर्याणी नाव पडले आहे, तेच दम बिर्याणी शब्दाचे जनक आहेत. संजय राऊत यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व भारत असणे हे भारताचे भाग्य आहे असं म्हणले तरी हे खोटं ठरणार नाही.

संजय राऊत प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप लावत संदीप देशपांडे म्हणाले की संजय राऊत जी फेकमफेक करत आहेत, त्यांनी ती बंद करावी. आता संजय राऊतांचे महत्व कमी झाले आहे आणि त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे चर्चेत राहू इच्छित आहेत. पक्षाचे जे सरकार आहे त्यात आता काम नाही. जो पर्यंत काम होतं तो पर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांना वापरुन घेतलं. आता प्रसिद्ध होण्यासाठी हे सगळं ते करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/