देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटले, तासभर बोलल्यानंतर आता चर्चा तर होणारच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्वाची होती. दरम्यान, आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची आज मुंबईत भेट घेतली. फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईतील सांताक्रूझच्या ग्रँड हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांच्यात भेट झाली. या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली असून, दोन्ही पक्षातील कोणालाही या बैठकीची कल्पना नव्हती. त्यांच्यामध्ये दुपारी १.३० ते ३.३० अशी तब्बल अडीच तास चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान काय बातचीत झाली याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासुन भाजपने महाविकास आघाडी सरकारला त्यातल्या त्यात शिवसेनेला विविध मुद्द्यांवरुन धारेवर धरलं आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तसेच कोरोनाने होणारे मृत्यू, बेडची उपलब्धता, अशा अनेक मुद्द्यांवरुन भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी ही भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रवीण दरेकरांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार या भेटीबाबत म्हणाले

‘शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या नाहीतर आता मनानेही वेगळे झाले आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असं वाटत नाही’ असे मुनगंटीवार यांनी सांगितलं.