कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही ; अन् सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही ! संजय राऊतांचा टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ( Sivsena) आणि भाजपमध्ये ( BJP) मागील काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तुतू मै मै सुरु आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. उत्तम राज्य कारभार चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” अशा शब्दात राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, चांगल्या विरोधकांचं स्वागत करायला हवे असे माझे ठाम मत आहे. परंतु, विरोधी पक्ष अस्तित्वात राहू नये असे केंद्र सरकारला वाटते. लोकशाहीत उत्तम विरोधी असल्याशिवाय खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होत नाही. पण राज्यात सत्तांतर घडल्यादिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात जी काही भूमिका घेतली ती लोकशाहीला पूरक नाही. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता. परंतू, माझ्यासारख्या काही लोकांना राज्यात सत्तांतर होऊन याप्रकारे तीन पक्षांचे मिळून सरकार बनवता येईल असे खात्रीपूर्वक वाटत होते. आणि तसे करून देखील दाखवले. यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे. आणि आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता..!
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी राज्यपालांवर देखील यावेळी टीका केली. राज्यपालांवर टीका करताना ते म्हणाले की,राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर शरद पवार आमचे नेते असून राज्यपालांना मार्गदर्शन हवे असल्यास मी पवार साहेबांना त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करेल. तसेच राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

You might also like