Lockdown बाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत थेट संकेत दिले आहेत. या बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला आहे. व्यापारी आणि इतर छोट्या घटकांचा विचार करत त्यांनी लॉकडाउन अमान्य केला. त्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्याचीच नाही तर देशाची परिस्थिती गंभीर आहे. कालच्या बैठकीचे गांभीर्य सर्वांना समजल पाहिजे. मला असे वाटते की, केवळ राज्यातच नव्हे तर देशात लॉकडाउनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी हे कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षातल्या लोकांना कोरोना होणार नाही हे विरोधकांनी डोक्यातून काढून टाकावे. सध्या राज्याचीच नाही तर देशाची परिस्थिती गंभीर आहे. देशाची अवस्था पाहता देशपातळीवर लॉकडाउनसारखी पावल उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण केंद्र सरकार हे आपला स्वार्थ पाहून निर्णय घेते. सध्या 5 राज्यात निवडणुका होत असल्याने लॉकडाउनचा विचार केला जात नाही. पण निवडणुका आहेत म्हणून माणूस मारता येणार नाही. कारण जीव महत्त्वाचा आहे. राजकारण कधीही करता येइल. बंगालमध्ये कोरोना नाही असे आता वाटत असले तरी नंतर परिस्थिती भीषण असेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे.