राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही तर खुलं वॉर सुरुय : खा. संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हे आमचे शीतयुद्ध नसून हे खुलं वॉर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

नाशिकमध्ये नूतनीकरण केलेल्या शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री मंडळाच्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांवर घटनेने बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, अशी टीका राऊत यांनी राज्यपालांवर केली. राज्य शासनाने 12 आमदारांची शिफारस केली असताना राज्यपालांनी हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितल्यानंतर एक दिवस आधिच सरकारने परवानगी नाकारली. असे असतानाही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले. विमानात 15 मिनिटे बसावे लागले यामुळे त्यांचा अपमान झाला. तर मग कॅबिनेटने दिलेला प्रस्ताव मागील कित्येक दिवसांपासून पडून आहे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, हा कॅबिनेटचा अपमान नाही का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

त्यामुळे रंजन गोगोई यांच्यावर विश्वास नाही

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेवर केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, न्यायव्यवस्थेवर टीका करु नये असे सांगितले जाते. गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीत या गोष्टी जर उजेडात आणल्या असत्या तर चांगलं झालं असतं. आता ते भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर देखील विश्वास नाही, असे राऊत यांनी सांगितले.

पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होईल, पण..

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याच्या प्रतिमेला तडा जाईल असे प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. संजय राठोड त्यांच्या समाजाचे मोठे नेते आहे. विरोधी पक्षाने एक दिशा ठरवली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल पण विरोधकांनी ठरवलेल्या दिशेने नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.