शिवरायांचा पुतळा हटवल्या प्रकरणी संजय राऊतांचा फडणवीसांना टोला, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती गावातील मुख्य चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आला. यामुळे शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेला एक दिवस उलटला तरी अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे.

कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात. आणि दुसरीकडे भाजपच्या राज्यात शिवरायांचा अवमान केला जातो. हे खपवून न घेण्यासारखे आहे. भाजपने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पूर्ण सन्मानाने शिवरायांचा पुतळा पुन्हा तिथे लावावा. यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तिथे जायला तयार असल्याचे राऊत यांनी सल्लावजा टोला लगावला.

मनगुत्ती ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांसह राणी चन्नमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी अशा महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याचे ठरले आहे. त्यानुसार गावातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला होता. मात्र, एका गटातील युवकांनी त्यास विरोध करत पुतळा काढण्यासाठी दबाव सुरु केला. राज्य सरकारच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हलवण्यात आला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.