Sanjay Raut : ‘शिवसेनेसारखं काम बाकीच्या पक्षांना करता आलं नाही म्हणून इतर राज्यात चिता पटेलेल्या दिसताहेत’; केलं मुख्यमंत्र्यांचं ‘कौतुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईनं कोरोना लढाईत केलेल्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन कौतुक केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहे. तसेच शिवसेनेने केलेल्या कामांचे उदाहरण देत त्यांनी शिवसेनेनं ज्याप्रमाणे काम केले तसे काम इतर पक्षांना करता आले नाही. त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटल्याचे पहायला मिळत आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोना लढाईत मुंबईनं केलेल्या कामाचे कौतुक देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केले. या संदर्भात राऊत यांना विचारण्यात आले असता त्यांनी शिवसेनेनं केलेल्या कामाचा दाखल दिला. ते म्हणाले, आम्ही आता देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यातील तीन कोरोना सेंटरचं उद्घाटन केले. हे सरकारी सेंटर नसून शिवसेनेच्या माध्यमातून हे सेंटर उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीबाबत विचारले असता राऊत यांनी सांगितले की, सरकारला समांतर अशी कोरोना केंद्र आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्ते देखील उभारत आहेत. यामुळे सरकारवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होत आहे. हे इतर राज्यांना आजवर जमलेलं नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेनं ज्या प्रमाणे काम केलं तसे काम इतर पक्षांना जमलेलं नाही. त्यामुळे इतर राज्यात आज चिता पेटलेल्या दिसत आहेत. आज कब्रस्तानमध्ये जागा अपुरी पडत आहे. याचे कारण हेच आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोनांमुळे यश मिळत आहे. यामुळे महाराष्ट्र पॅटर्न किंवा महाराष्ट्र मॉडेल असा संदर्भ दिला जात आहे. याचाच उल्लेख करुन सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केलं आहे. याची दखल पंतप्रधानांनी देखील घेतली. त्यांनी महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचे कौतुक केले. महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर लढली आहे. याचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जाते, असे संजय राऊत यांनी सांगितले.