महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक ? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहोत. राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. मध्यावधी निवडणुका घ्यायच्याच असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं फडणवीस-राऊत भेटीचं गूढ आणखी वाढलं आहे. दोन वेगवेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर तर नक्कीच बोलणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याशिवाय निवडणुकांबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं होतं. मुंबईत पत्रकारांसोबत ते बोलत होते. यानंतर आता संजय राऊत यांनी फडणवीसांसोबत झालेल्या भेटीबद्दल पुन्हा एकदा खुलासा केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ” राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयक, जम्मू काश्मीर, चीन , पाकिस्तान, कोरोनाबद्दल चर्चा होते” असं म्हणत राऊतांनी चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबल उडाली आहे. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे 2 नेते अचानक गुप्तपणे भेटल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत सामनातील मुलाखतीची चर्चा झाली असल्याचं संजय राऊतांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.