सचिन वाझेंचा शिवसेनेसोबत संबंध? संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांच्या अटकेनंतर एनआयए आता मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचाही तपास करत आहे. वाझे यांनी हे सर्व स्वत:च्या मर्जीने केलेले नसून यामागे आणखी बड्या व्यक्तींचा समावेश असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच

वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. वाझे यांचा शिवसेनेशी संबंध असल्याच्या चर्चा होत आहेत. यासर्वांवर शिवेसना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारमध्ये काहीही घडामोडी घडत नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एका एपीआयमुळं सरकार अस्थिर झालय या भ्रमातून बाहेर पडावे. चंद्रशेखर यांच दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळल होते. मात्र महाराष्ट्रात तसे काही होणार नाही, असे म्हणत राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. तसेच वाझे शिवसेनेशी संबंधित असल्याच्या चर्चांवरुन राऊत म्हणाले की, एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासोबत संबंधित असेल तर चुकीच आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे. तसेच कोणाला कोणती खाती द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण हे 3 पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.