गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये ! संजय राऊत यांचा टोला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे सोडण्यावरुन राजकारण पेटले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्य सरकारमध्ये ट्विटरवार सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटनंतर महाराष्टातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले होते. त्यावर आता संजय राऊत यांनी देखील रेल्वेमंत्र्यांना ट्विट करत टोला लगावला आहे.

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असे उत्तर दिले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी वादात उडी घेउन महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये. असा टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचे तुम्ही सांगितले होते. ती यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असेही पियुष गोयल म्हणाले होते.