‘स्वप्न पाहण्यातच यांची 4 वर्ष निघून जातील’, संजय राऊतांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार पाच वर्षे निश्चित पूर्ण करेल. भाजपची पुढील चार वर्षे फक्त स्वप्नं पाहण्यातच निघून जातील, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला होता. त्यावर राऊत यांनी वार्ताहरांना बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, “राज्यात ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्याची आज पुण्यतिथी असून, आता त्यांना तीन महिन्यांत सरकार स्थापन करायचे असेल, तर शुभेच्छा. स्वप्न पाहण्यातच त्यांची चार वर्षे निघून जातील, असा चिमटा त्यांनी काढला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून, आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रातील नागरिक महाविकास आघाडीसोबत आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वांत मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगले काम करत आहे,” असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

परभणीत पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, पुढच्या दोन ते तीन महिन्यांत आपले सरकार स्थापन होईल. आपण फक्त विधान परिषद निवडणूक पार पडण्याची वाट पाहत आहोत, असा दावा त्यांनी व्यक्त केला.

You might also like