‘PM मोदींनी एवढं सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल’ !

पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण देशात खरे संकट कोरोनाला आटोक्यात आणणे, घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणे याचा आहे. त्यावर कधी विजय मिळवणार ? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यासमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना करोनाचे राजकारण थांबवा (Stop the politics of coronation) एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल, असा सल्ला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( To Prime Minister Narendra Modi) दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीबरोबरच राज्यात करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध मुद्यांवरून भाजपा नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. देशात निर्माण झालेल्या करोना परिस्थितीकडे लक्ष वेधत खा. राऊत यांनी ‘रोखठोक’ मधून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीकेचा बाण डागला आहे. राज्यातील नेत्यांनाबरोबरच राऊत यांनी पंतप्रधान मोदींनाही सल्ला दिला आहे.

राऊत यांनी दिल्ली व राज्यातील करोना परिस्थितीकडे भाजपा नेत्यांचे लक्ष वेधले आहे. दिल्लीत करोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत कोरोनाचा स्फोट झालेला मी पाहिला. एका दिवसात साधारण साडेसात हजार करोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासामध्ये साधारण 150 म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले. हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत करोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरु आहे. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी करावा असा सवाल राऊत यांनी भाजपाला केला आहे.

राज्यातील भाजपा नेते कसे विसरतात?
मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपाचे नेते करत होते. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजपा नेते कसे विसरतात? बिहारमधील बहुतेक सर्व जिल्ह्यात तेथील प्रशासनाने छठपूजा घरच्या घरीच साजरी करण्याचे आदेश काढले. पण महाराष्ट्रात भाजपाची भूमिका वेगळी. ज्यांनी मुंबईत छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे, असेही राऊत म्हणाले.

… ते जनतेचे शत्रू आहेत.
महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण 72 तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले. बिहारात विजय मिळवला म्हणून करोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय? कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉक डाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये.