संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…नाहीतर गंगेत तरंगणार्‍या पापांचे मालक म्हणून समोर या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशाची बिकट अवस्था झाली आहे. त्यातच काही राजकीय नेत्यांकडून कोरोनावर गोमूत्र हाच उपाय असल्याचे सांगितले जात. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही पण तरीही याचा प्रचार केला जात आहे. नुकताच भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या मते नियमीत गोमूत्र पिल्याने त्यांना कोरोना झाला नसल्याचे सांगितले. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर हल्लबोल केला आहे. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच असून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

संकटकाळातही राजकारण सुरु आहे. कोरोना, चक्रीवादळ असे संकट असतानाही महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की, सध्याच्या परिस्थितीत निवडणुका घेतल्या तर भाजपला ४०० जागा मिळतील. केवढा हा आत्मविश्वास. इकडे लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत. आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू! अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले. रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी हिंदुस्थानातील गोमूत्र प्राशनावर आपली चेष्टा केली आहे. जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह गन्गेत तरंगत आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कारही होऊ शकले नाही. त्यांना जर हा गोमुत्राचा संदेश पोहोचला असता तर त्यांचे प्राण वाचले असते. त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. या घटनेमुळे हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला.

सीबीआयचे लोक प. बंगालात घुसत बेकायदेशीरपणे ममता सरकारातील दोन मंत्री व दोन आमदारांना अटक केली. विधानसभा अध्यक्षांनी या मंत्र्यांना अटक करण्याची परवानगी दिलीच नव्हती. मुळात ज्या प्रकरणात हे अटकसत्र झाले त्या ‘नारदा’ स्टिंग प्रकरणात भाजपचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेन्दू अधिकारी यांचा देखील सहभाग आहे. त्या चित्रफितीत अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे दिसते. पण हे अधिकारी महाशय ममतांना सोडून भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. यावर राज्यपाल धनकड मौन बाळगून आहेत व त्यांची नौटंकी चालू आहे. ‘नारदा’ स्टिंग प्रकरणात अडकलेल्या सहाच्या सहा लोकांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असते तर सीबीआयच्या कारवाईवर कोणीच प्रश्न उपस्थित केला नसता. पण जे भाजपमध्ये गेले ते सुटले हा इथं मुद्दा आहे. प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी विजयी झाल्या याचा सूड घेतला जात आहे’, अशी टीकाही राऊत यांनी केली.

दिल्लीच्या भिंतीवर कुणी तरी ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?’ अशी विचारणा करणारी पोस्टर्स चिकटवली आणि पोलिसांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ गरीब मुलांना अटक करून तुरुंगात डांबले. आता काँग्रेसने तीच पोस्टर्स उघडपणे मुंबईत लावली. मोठ्या प्रमाणात ‘व्हॅक्सिन उत्पादन करणारा हिंदुस्तान आहे. सरकारने १२ एप्रिलला ‘लस उत्सव’ साजरा केला, पण लसीचा ठणठणाट होता. लसीकरणात गेल्या ३० दिवसांत ८० टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या कंपन्यांत जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? हिंदुस्थानातील लस उत्पादक कंपन्यांना अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे हिंदुस्थानात बनलेली ही लस आधी मोठ्या प्रमाणावर परदेशात पोहोचली व हिंदुस्थानात प्रेतांचे खच पडले. मुडदे गंगेत तरंगत राहिले. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ हा प्रश्न त्यामुळे चुकीचा ठरत नाही, असंही राऊत यांनी म्हंटल आहे.

गंगेत मुडद्याच्या रूपात राष्ट्रवाद वाहताना आणि तरंगताना आपण पाहिला. आता यावर जे बोलतील ते राष्ट्रद्रोही ठरतील. कोरोनाशी लढण्याची संपूर्ण जग रणनीती आखत असताना आपले नेतृत्त्व निवडणूक कशी जिकता येईल यात गुंतले आहे. अमेरिका ‘मास्कमुक्त’ झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळविला व मोठी आर्थिक झेप घेतली. मात्र आम्ही कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. त्याचा परिणाम गंगेत प्रेते वाहताना दिसली. आता कोरोनाची तिसरी लाट येत आहे. काय सांगावे? लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल. आमच्या राज्यकर्त्यांकडे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल’, असा टोलाही रोखठोकमधून राऊत यांनी लगावला आहे.