‘हे’ भाजपाचे 4 खेळाडू आहेत, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. यावर भाजपानं राष्ट्रपती भवन, राज्यपाल भवन आणि महाराष्ट्राचा काळाबाजार केला आहे. भाजपाला फोडाफोडी करता यावी, यासाठीच 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली, असा आरोप राऊत यांनी केला. निवडणुकांचे निकाल लागल्यापासून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत सातत्याने शिवसेनेची भूमिका मांडून भाजपवर टीका करत आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘देशाच्या इतिहासात असा काळा दिवस आम्ही पाहिला नाही. भाजपानं राष्ट्रपती भवन, राज्यपाल भवनाचा काळा बाजार केला. भाजपाकडं बहुमत होत तर लपूनछपून शपथ का घेतली. भाजपा दबाव आणण्याचे प्रयत्न करत आहेत. सीबीआय, ईडी, आयकर आणि पोलीस हे भाजपाचे चार खेळाडू आहेत. तर राष्ट्रपती भवन आणि राजभवन हे राखीव खेळाडू आहेत. राज्यपालांचं नाव भगवान आहे, पण त्यांनी भाजपाला वेगळा आणि आम्हाला वेगळा न्याय दिला.’

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रात घडलेल्या या अनपेक्षित राजकीय घटनेने महाराष्ट्रातील जनता आश्चर्यचकित झाली आहे तर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून हा पेच अद्याप न सुटल्याने सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

Visit : Policenama.com