आमच्या मनात आलं तर आगामी 25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत असून लवकरच यावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पुढील 25 वर्षांसाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद वाटून जाणार असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

अनेकवेळा मुख्यमंत्रीपदाबाबत बोलले आहेत राऊत –

बुधवारी संध्याकाळी डिस्चार्ज भेटल्यानंतर राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. याआधी देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे म्हटले आहे. आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी काल अमित शहा यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी यांना उत्तम व्यक्ती म्हटले होते.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सकारात्मक चर्चा –

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहाय्याने शिवसेना आपला मुख्यमंत्री बसवणार असून यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या जोरदार बैठका सुरु आहेत. यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला जात असून यामध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे नक्की आहे. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे तिघेजण चर्चेसाठी असून काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे हे नेते चर्चेसाठी असून शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे चर्चेसाठी आहेत. राज्यात सध्या शेतकरी संकटात असून त्यांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेत असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 12 आणि 14 मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपच्या देखील बैठका सुरु –

या तिन्ही पक्षांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजपच्या देखील बैठका सुरु असून वरिष्ठ पातळीवर सरकार स्थापनेविषयी चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like