ठाकरे चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांमधील वाद टोकाला, राऊतांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी निर्माते आणि दिग्दर्शकांमधील मानपमानाचा नाट्यमय वाद टोकाला गेला आहे. मी हा चित्रपट मा. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला आहे, बाकी कुणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न आहे, असं चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी म्हटल्याचे ट्विट मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यावरून आता ठाकरे चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबद्दल सारवासारव करत अभिजीत पानसेंना कोपरखळी मारली आहे.

लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यापुर्वी या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी सारवासारव केली होती. अभिजीत पानसे यांना काही काम होतं आणि या कार्यक्रमात सगळेच ये-जा करत असतात. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसेंना बसण्यासाठी योग्य सीट न मिळाल्याने स्क्रीनिंग अर्धवट सोडून निघून गेले होते.

मात्र या मानापमानाच्या नाट्यानंतर मनसेने अभिजित पानसे यांच्या समर्थनार्थ #Isupportabhijitpanse ही मोहीम सुरु केली आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘मा.बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकालासुद्धा प्रेमाने वागवायचे. त्याचा अपमान नाही करायचे. हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे, जो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना सुद्धा कळला नाही’, असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. तसंच ‘आज परत तेच झालं, शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला. पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी. राजसाहेब बरोबर बोलले होते अभिजित हे तुला फसवणार’ असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.