भाजप स्वार्थी, म्हणून आम्ही आमचाच विचार करणार : शिवसेना 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत तसतश्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात भाजप आणि शिवसेना आगामी निवडणुकीत युती करतील की नाही याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २०१९ च्या निवडणूकी बाबबत एक अंदाज वर्तवला आहे. तसंच भाजप स्वार्थी आहे, त्यामुळे आम्हीही आमचाच विचार करणार, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या शब्दकोषात युती हा शब्द नाही. भाजप केवळ स्वत:पुरता विचार करत आहे. भाजप स्वार्थी आहे. त्यामुळे आम्हीही केवळ आमचाच विचार करु. भाजपचे सहकारी त्यांची साथ सोडून जात आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे. शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेतल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज राऊतांनी व्यक्त केला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्रिशंकू परिस्थिती होईल. त्यामुळे मोदींच्या नावाला अनेकांचा विरोध होईल. गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार केलं जाऊ शकतं. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन, भाजप कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यास तयार रहा अशा सूचना केल्या होत्या. त्याचवेळी शाह यांनी विरोधकांना ‘पटकण्याची’ भाषा केली होती. त्यावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे.