…तर पंतप्रधान एनडीएचे घटक पक्ष ठरवतील : संजय राऊत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने २०० पेक्षा कमी जागा जिंकल्या तर पुढील पंतप्रधान कोण होईल हे एनडीएचे घटक पक्ष ठरवतील, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

हिंदुत्वाचा मुद्द्यावर शिवसेना-भाजपने युती केली. मात्र संजय राऊतांच्या वक्तव्यावरून शिवसेना अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर नाराज असल्यासारखे वाटत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे सरकार आलं ते भाजपचं होतं, पण २०१९ च्या लोकसभेत येणारे सरकार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं मत राऊतांनी यावेळी व्यक्त केले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकमुळे देशातील वातावरण बदललेले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला स्थिर सरकार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे एनडीएचे घटक पक्ष आणि भाजप आम्ही मिळून ३०० च्या वर जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या निवडणुकीत नवीन पंतप्रधान हे पुन्हा नरेंद्र मोदीच होतील, अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. जर भाजपने मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडून दिलं तर ते पंतप्रधान होतील. भाजपचा जो प्रचार चाललेला आहे तो मोदींच्याच नावाने चाललेला आहे. मोदींच्याच नावाने आपण सगळे मत मागत आहोत ना. तर मोदीच पंतप्रधान राहतील. भाजपमध्ये तसा कोणताही दुसरा नेता दिसत नाही, जो मोदींची जागा घेऊ शकेल, असं कौतुकही त्यांनी केले. तसंच भाजपला २०० च्या खाली जागा मिळाल्या तर मित्र पक्षांना किंवा घटक पक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, देशाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्यात मतभेद असले तरी काही भूमिका आणि मागण्या एकच आहेत. ज्या मुद्यांसाठी भांडलो तो मुद्दा भाजपने सोडणवण्याचा प्रयत्न केला. या कारणामुळे आम्ही युती केली. तसंच ही युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, असंही राऊतांनी यावेळी नमूद केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like