‘सावरकरांना विरोध करणाऱ्यांनी 2 दिवस अंदमानच्या तुरुंगात जाऊन यावे’, संजय राऊतांचा काँग्रेसवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काॅंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन विरोध करणाऱ्यांनी दोन दिवस अंदमान येथील तुरुंगात जाऊन राहावे. तेव्हाच त्यांना सावरकरांच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव होईल”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, वीर सावरकर यांच्या मुद्यावरून राजकीय पक्षांमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही विरोध करू, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केलं होत. त्यानंतर आता सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून काॅंग्रेसवर निशाणा साधला.

‘महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागबद्दलही अनेक शंका उपस्थित केल्या जातात. मात्र, सावरकर आणि त्यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांच्या वाट्याला जो छळ, अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेल यांच्या वाट्याला आला नाही. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली, असे अर्धसत्य बोलले जात आहे, मात्र त्यांनी माफी मागितलीही असेल, तर यात काय चूक केली. ब्रिटिश राजवटीत कोणी प्रसंगानुसार देशभक्त बनला तर कोणी अपघाताने. परंतु सावरकरांचे क्रांतिकार्य अमर आहे. 14 वर्षे अंदमानात त्यांनी यातना भोगल्या.

सावरकरांनी बाहेर यावे, ही सगळ्यांचीच इच्छा होती. अटी शर्तींवर त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. सावरकरांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर सावरकर हसत हसत फासावर गेले असते. सावरकरांनी मृत्यूला अनेकदा चकवले. अंदमानाच्या शिक्षेनंतर त्यांनी रत्नागिरीतले आयुष्यही राष्ट्रीय कामासाठीच अर्पण केले, असे म्हणत वीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांवर राऊत यांनी जोरदार टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/