युती तुटणार ? संजय राऊतांनी दिवाकर रावतेंचा ‘कित्‍ता’ गिरवला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यात आचारसंहिता कधी लागणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र अजूनही जागावाटपावर निर्णय होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बोलताना म्हटले कि, जर समसमान जागावाटप नाही झाले तर युती तुटण्याची देखील शक्यता आहे. त्यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रावते यांचे समर्थन केले आहे.

रावते यांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, भाजप अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर आमचा 50-50 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे दिवाकर रावते काहीही चुकीचे बोलले नाहीत. मात्र जागावाटपात सध्या भाजप शिवसेनेला 120 जागा देणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता युतीचा काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, दिवाकर रावते यांच्या या वक्तव्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांना टोला लागवताना म्हटले होते कि, ज्यांना युतीबद्दल बोलायचं अधिकार नाही, त्यांनी यावर भाष्य करू नये. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या विधानानंतर गिरीश महाजन काय प्रतिक्रिया देता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.