योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये ? : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा अधिक गाजत आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौर्‍यावर पुन्हा भाष्य केलं आहे.

संजय राऊत माध्यमांना म्हणाले की, मुंबईचे महत्त्व कुणीही कमी करू शकत नाही. पण, मुंबईच्या धर्तीवर कोणी विकास करत असेल, उत्तर प्रदेशसारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल. तिथे रोजगार निर्मिती होणार असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करतो. कारण, मुंबईवरचा ताण कमी होईल, त्यासंदर्भात योगी यांना मदत लागली तर आम्ही नक्की करू, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

संपूर्ण देशाचा विकास व्हावा. उत्तर प्रदेशचा सर्वांत अगोदर व्हावा, कारण संपूर्ण देशावर त्यांचा ताण आहे, तिथे मागासलेपण अधिक आहे. याअगोदर ही नोएडा इथं फिल्मसिटी उभी राहिली होती. त्याचं काय झालं? तसाही पुनर्विकास त्यांनी करायला हवा. अनेक कलाकार जे जुहू, बांद्रा, पाली हिल तिथे राहतात तेही उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होणार का? भाजपच्या लोकांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून संबोधलं होतं. आता भाजपच्या लोकांनी हे स्पष्ट केलं पाहिजे, की योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये आले आहेत की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये?, कारण ‘ती’ नटी म्हणतेय याला ‘पीओके’ आहे.

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्यामुळे पक्षाला एक नवा चेहरा मिळाला आहे. त्यांचा अभ्यास उत्तम आहे. राज्यपालांना कॅबिनेटने केलेला प्रस्ताव मंजूर करावा लागेल. मला वाटत नाही, राज्यपाल कोणत्या घटनेच्या विरोधात काम करतील?, थोडा उशीर होईल. कारण 12 नावांचा तो अभ्यास असतो, त्यामुळे उशीर होईल; पण नक्की ते सही करतील.