ऊर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आज (सोमवारी) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरती आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांना बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “ऊर्मिला मातोंडकर या मुळात शिवसैनिक होत्या. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी समाधानाची बाब आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल.”

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर भाजपवर टीका करतानाच त्यांनी म्हटलं, “ईडी आणि सीबीआय यांसारख्या संस्था या चीन सीमेवर पाठवाव्यात. कारण त्या दुश्मनांना जेरीस आणतात, त्यांना विरोधकांविरुद्ध कसे काम करायचे हे चांगले ठाऊक आहे.”

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, ” पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगाला आदर्श दाखवून दिला. एवढ्या शांततेनं आंदोलन सुरू होते. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पोलीस बळाचा वापर केला. तो वापर चीनसाठी केला असता, तर लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केली नसती,” असा चिमटाही त्यांनी मोदी सरकारला काढला.

या कारणाने ऊर्मिला यांनी ‘काँग्रेस’ला ठोकला राम राम
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ऊर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांच्याविरुद्ध उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला.

दरम्यान, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी १ जागेसाठी शिवसेनेनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली होती. आता त्या थेट सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे कळतं.