Loksabha : ‘या’ कारणामुळे संजय शिंदेंना माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी

माढा : पोलीसनामा ऑनलाईन( सुरज शेंडगे ) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार यांनी माघार घेतल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक लढलेल्या संजय शिंदेंना शरद पवार उमेदवारी देण्यास तयार का झाले, याची कारणे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दडलेली आहेत.

संजय शिंदे तगडे उमेदवार

संजय शिंदे हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट भाजप नेत्यांना पचली नाही. तसेच शरद पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघारच घेतली होती. परंतु, शरद पवार यांनी घेतलेली माघार आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश यामुळे संजय शिंदे यांचा ओढा राष्ट्रवादीकडे वाढला. त्यांनी शरद पवार यांच्याशी बातचीत करून लोकसभा निवडणूक लढण्यास होकार दिला. एकंदरच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे शिंदे हे तगडे उमेदवार आहेत.

राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला तिलांजली देणारा पर्याय

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांना आपले पुत्र रणजित शिंदे यांना आमदार करण्याची खूप इच्छा आहे. मात्र, या इच्छेला संजय शिंदे अडथळा ठरत होते. कारण रणजित शिंदेंना आमदार करण्याआधी मला आमदार करा असा हट्ट संजय शिंदे आपल्या बंधू म्हणजे बबन शिंदे यांच्याकडे करत होते. यातून राष्ट्रवादीला तगडा उमेदवार पाहिजे होता आणि बबन शिंदे यांना बंधू की पुत्र या पेचातून तोडगा हवा होता, म्हणून बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीची माढा लोकसभेची उमेदवारी संजय शिंदे यांना मिळवून देण्यास मोठी भूमिका बजावली.

संजय शिंदे हे मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक

संजय शिंदे हे मोहिते पाटील घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून गणले जातात. अजित पवार यांचे समर्थक असणारे संजय शिंदे अगोदर मोहिते पाटील घराण्यासोबत राजकारणात सक्रिय होते. मात्र, अजित पवार यांनी पक्षांतर्गत काही नेत्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मोहिते पाटील यांच्यावर देखील अजित पवार यांची वक्रदृष्टी पडली आणि मोहिते पाटील यांना राजकीय शह देण्यासाठी अजित पवार यांनी संजय शिंदे यांना बळ दिले. म्हणून कधी काळचे मोहिते पाटील यांचे सोबती असणारे संजय शिंदे त्यांचे राजकीय वैरी झाले. भाजपमध्ये गेलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपची उमेदवारी दिली तर संजय शिंदे यांच्यासारखा कट्टर विरोधक शोधून सापडणार नाही, म्हणून राष्ट्रवादीने माढ्याच्या उमेदवारीची माळ संजय शिंदे यांच्या गळ्यात टाकली आहे.

करमाळा विधानसभा निवडणुकीत गटबाजी टाळण्यासाठी संजय शिंदेंना उमेदवारी

गत विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून संजय शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल निवडणुकीच्या आखाड्यात होत्या. संजय शिंदे यांच्या उमेदवारीचा तोटा रश्मी बागल यांना बसला आणि परिणामी शिवसेनेचे नारायण पाटील अवघ्या काही मतांनी संजय शिंदे आणि रश्मी बागल यांचा पराभव करून विधानसभेवर गेले. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीची हातची जागा गेली. त्यामुळे संजय शिंदे यांना माढ्याची लोकसभेची उमेदवारी द्यायची आणि निवडून आणायचे असे शरद पवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवले आहे. संजय शिंदे लोकसभेला निवडून आले म्हणजे नव्याने भाजपात गेलेल्या मोहिते पाटील घराण्याला शह देता येईल अशी रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे. तसेच संजय शिंदे यांचे खासदार होणे बबन शिंदे आणि रश्मी बागल यांच्या मार्गातील अडसर दूर होण्यासारखे आहे.