माढा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभाची रणधुमाळी रंगली आहे. त्यात माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. मोहिते पाटील ही राजकारणात मोडीत निघालेली भांडी आहेत. पवार साहेबांनी १० वर्षे ती कल्हई करून चालवली. पण ती देखील चालेनात हे पवारांच्या लक्षात आल्यावर आता ही भांडी भाजपने चालवायला घेतली आहेत, अशा शब्दात संजय शिंदे यांनी मोहिते पाटलांवर टीका केली.
मागील १० वर्षे याच मोहिते पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीत विरोध करीत मी भाजपच्या जवळ गेलो होतो. मात्र, पुन्हा भाजपने यांनाच पक्षात प्रवेश दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे स्पष्टीकरण संजय शिंदे यांनी यावेळी दिलं. आपण कधीही भाजपात प्रवेश केलेला नव्हता. मात्र, भाजपात राष्ट्रवादीपेक्षा जास्त गटबाजी अनुभवायला मिळाली. त्यामुळे नंतर भाजपापासूनही दूर थांबत जिल्हापरिषदेचे काम करीत राहिलो, असंही शिंदे यांनी सांगितलं.
मागील काही दिवसांत भाजपमध्ये राज्यातील मोठ्या घराण्यांनी प्रवेश केला त्यावरून शिंदे यांनी त्यावर टोला लगावला. राज्यातील घराणी वाचवण्याचे काम भाजप करू लागला आहे. ही घराणी म्हणजे पोकळ वासा आहे, याची जाणीवही लवकरच होईल. मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांमध्ये जनतेचे पैसे अडकले आहेत. त्यांनी ते पैसे जर लगेच दिले तर आपण लोकसभेच्या प्रचाराला सुद्धा बाहेर पडणार नाही, असं आव्हान देखील शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिले.
मोहिते विरुद्ध शिंदे ही लढत साऱ्या महाराष्ट्राला पाहायची आहे. मी तर माझी उमेदवारी जाहीर केली, आता मुख्यमंत्र्यांना जाहीर केल्याप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपाची उमेदवारी द्यावी, असं आव्हानही शिंदेंनी दिले आहे.