संजय शिंदेंचा ‘रत्नाकर गुट्टे’ करू, चंद्रकांत पाटलांचा धमकीवजा इशारा

सोलापूरात रंगणार सुडाचं राजकारण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नेत्यांचे आरोपा-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदेवर टीका केली आहे. तसंच संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलली आहेत. त्यामुळे रत्नाकर गुट्टेंना जसे तुरुंगात टाकले तसे त्यांनाही टाकू, असा धमकीवजा इशारा चंद्रकांत पाटीलांनी दिला आहे.

संजय शिंदे हे सोलापूर जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. संजय शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे विरोधक म्हणून ओळखले जातात. विजय सिंह मोहिते पाटलांना विरोध करण्यासाठी संजय शिंदेंनी भाजपच्या मदतीने जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, निवडणुक जवळ येताच राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. याकारणामुळे शिंदे भाजपच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर आरोप करत त्यांचा रत्नाकर गुट्टे करू असा इशारा दिली आहे.

दरम्यान, रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे संचालक आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले होते. त्या प्रकरणी त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. याच प्रकरणाचा संदर्भ पाटलांनी यावेळी दिला. गुट्टेंप्रमाणे शिंदेंना देखील गजाआड पाठवू, असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने येणाऱ्या काळात माढा मतदार संघात सुडाचे राजकारण पाहायला मिळाणार आहे, असेच दिसत आहे.