बागलांची घड्याळाला साथ ; करमाळ्याची आमदारकी ‘फिक्स’

करमाळा/ सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या करमाळा विधानसभा मतदार संघात करमाळा शहरासह ११८ गावे आणि माढा तालुकयातील कुर्डुवाडीसह ३६ गावांचा समावेश आहे. मंगळवारी या भागात एकूण ६२. ४० टक्के मतदान झाले. यात खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे विरुद्ध भाजप-शिवसेनेचे उमेदवार रणजित नाईक -निंबाळकर या दोघांच्यात आहे.

एकीकडे संजयामामा शिंदे यांना प्रचारात बागल गटाने साथ दिली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रचारही जोरदार चालू होता. आता या निवडणुकीच्या निकालात मतविभागणीचा फटका कोणत्या पक्षाला बसणार याची गणित देखील मांडली जाऊ लागली आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांकडून मताधिक्य आपणच घेणार याबाबत ठाम विश्वास आहे. एव्हढेच नव्हे तर कोण जिंकून येणार याबाबत शर्यत देखील लावण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

बागलांना विधानसभेचा मार्ग सुकर
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष बनले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय शिंदे यांना पक्षात घेऊन आयत्यावेळी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याने बागल गटामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्याने बागल गटाला विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदारकीसाठी बागल गटाकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे बागल गटाकडून संजयमामांना कसल्याही परिस्थितीत करमाळ्यातून मताधिक्य मिळवून द्यायचे असा ठाम निर्णय केला आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.