संजीवन समाधी सोहळा आता ‘विश्वशांती दिवस’, डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तत्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधुन कार्तिकी शुध्द त्रयोदशी, म्हणजेच 13 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण जगभर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळा श्री. विश्वदर्शन देवता मानवता मंदिर, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न झाला.

यावेळी रामेश्वरमचे ट्रस्टी व विद्याउपासक स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे, अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख पुजारी पवन गुरूजी, इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड, सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.

तसेच, माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अ ध्यक्ष व विश्वस्त डॉ. मंगेश तु. कराड, सह कार्यकारी विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड-नागरे, महासचिव स्वाती कराड – चाटे, उपाध्यक्ष व विश्वस्त ज्योती कराड-ढाकणे, कवियत्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि पंढरपूरचे दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुह्य गुपीत सांगीतले आहे त्या मार्गावर समाज चालेल तर तो सुखी होईल. 724 वर्षापूर्वी त्यांनी सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला आहे. निसर्गाने कोरोनाच्या रूपात संपूर्ण जगाला दिलेली ही धोक्याची घंटा आहे. अशावेळेस साधू, संत आणि महात्म्यांनी दिलेला संदेशाचे अनुकरण केल्यास मानवजातीचे कल्याण होईल.