संकष्टी चतुर्थी असूनही भाविकांना दर्शनापासून वंचित

पुणे, थेऊर – अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे आज संकष्टी चतुर्थी असूनही भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागले; परंतु अनेक भाविकांनी मुख्य दरवाजाच्या चौकटीत दर्शन घेतले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असल्याने महाराष्ट्रातील यावर आधारित असलेल्या व्यावसायिकांना अतिशय हालाखीचे दिवस काढावे लागत आहेत. गेली आठ महिने हे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. आपल्या संसाराचा गाडा ओढायचा कसा हा प्रश्न दररोज सतावतो आहे.

नोकरदार वर्गाला कोणतीच चिंता नाही; परंतु रोजंदारी करणारे कामगार छोटे व्यवसायिक मात्र कंगाल झाले आहेत. शासनाकडून कसलीच मदत मिळत नाही. आम्हाला आमचे व्यवसाय करायचे आहेत आपण मंदिरे उघडा अशी आर्त मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

पहाटे पाच वाजता देवालयाचे पुजारी ॐकार आगलावे यांनी महापूजा केली तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली याशिवाय कोणासही गाभार्यात प्रवेश मिळाला नाही, अशी माहिती मिळाली आहे