निलंबनामुळे संसद भवनाबाहेर रात्रभर 8 खासदारांचा ठिय्या

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यसभेत शेती विधेयक सादर होताना गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 8 ही खासदारांनी काल रात्रभर संसद भवनाच्या परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुढे धरणे प्रदर्शन केले. शेती विधेयकाला विरोध केल्यामुळे राज्यसभेतून निलंबित करण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे. डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची नावे आहेत.

राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार रात्रभर संसद परिसरात प्रदर्शन करीत होते. आज पहाटे खुद्द राजीव सातव यांनी ट्वीट करून आंदोलनाचा फोटो शेअर केले आहेत. सर्व खासदार अजूनही आंदोलन करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. या सर्व खासदारांनी संसदेच्या परिसरात रात्र काढली. राज्यसभेत शेती विधेयकाच्या चर्चेच्या वेळी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. गदारोळाला जबाबदार असल्याच्या कारणावरून विविध पक्षांच्या 8 खासदारांना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारातच निलंबनाला बसले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या खासदारांनी निलंबन झाल्यापासून ठिय्या ठोकला होता.