संत भगवान बाबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बीड : पोलिसनामा ऑनलाईन
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र भगवान गड येथील संत भगवान बाबांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन दिवसांपासून विविध भागातून आलेल्या दिंड्या तसेच वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भगवान गडावर दाखल झाले होते. आज मठाधिपती न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकोबाच्या’ जयघोषात आज (बुधवारी) दुपारी चार वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.

संत भगवान बाबांनी मराठवाड्यातून पहिली दिंडी काढली होती. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठी आणि पहिली दिंडी असा बहुमान असलेला पालखी सोहळा आज मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघाला आहे. या सोहळ्यामध्ये भगवान बाबांच्या शिष्य परंपरेतील ३० पेक्षा जास्त संस्थानाच्या दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तसेच राज्यभरातून आलेल्या २० हजारांपेक्षा जास्त वारकरी पालखीत उपस्थित झाले आहेत. पालखीचा पहिला मुक्काम भारजवाडी येथे तर यांनतरच्या मुक्काम अनुक्रमे बावी, खोकरमोहा, करंजवन ,डिघोळ ,जयवंतनगर ,कुंभेफळ, पिंपरी, कुर्डुवाडी आणि दहावा मुक्काम ढेकळेवाडी येथे असून यानंतर अकराव्या दिवशी पालखी पंढरपूरला पोहचते.

दरम्यान , दिंडी प्रस्थानासाठी ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे अध्यापक आचार्य नारायण महाराज शास्त्री, सिद्धेश्वर संस्थानचे महंत विवेकानंद शास्त्री, महंत भगवान महाराज रजपूत , संगीत विशारद सूर्यभान खेडकर , ज्ञानेश्वरी विद्यापीठातील विद्यार्थी यांसह भगवान गडावर परिसरातील भगवानभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.