संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान शनिवारी, मंदिर परिसर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित : प्रांताधिकारी तेली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १३ जून शनिवार पासून सुरू होत आहे. मात्र कोरोनाची वाढती साथ पाहता शासनाची परवानगी दिलेल्या विश्वस्त, सेवेकरी, मानकरी व थोडक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परंपरेनुसार पादुका प्रस्थान होणार असल्याची माहिती राजगुरूनगर, प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.

यंदा कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे सावट संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यावर आले आहे. आज मंगळवारी आळंदी देवस्थान पदाधिकारी, विश्वस्त, सेवक, मानकरी, पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी यांच्या समवेत मिटिंग झाले. यावेळी परंपरेनुसार, विधीनुसार माऊलींच्या पादुकांचे काही मोजक्याच भविकांसह प्रस्थान करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. यामध्ये शासनाने परवानगी दिलेल्यांनाच प्रस्थानास उपस्थित राहता येणार आहे. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी १३ ते ३० जून प्रयत्न मंदिराच्या सभामंडपात ठेवण्यात येणार आहे. या काळात मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करु नये, सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी तेली यांनी केले.

आळंदी येथे कोरोना बाधीत महिलेचा सोमवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित केला आहे. विना परवाना कोणी आल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली.