Coronavirus Lockdown : मदतीसाठी सरसावले हजारो हात ! संत निरंकारी मंडळाकडून घोडेगाव शाखेच्या वतीने जवळपास 47 कुटुंबाना मदत…

घोडेगाव (पुणे), पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणू या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केला असल्यामुळे सर्वच प्रशासन/यंत्रणा हैराण झाल्या असून या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र व राज्यशासनाने १४४ कलम लागू करत २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. परिणामी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे.

ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबाचा संसाराचा गाडा हा महिना किंवा वर्षाकाठी येणाऱ्या पैशांतून चालत असतो, त्यामुळे सध्या आवक थांबल्याने या कुटूंबांना मोठी झळ बसलेली आहे. दरम्यान हातावर काम करून रोजचा गाडा चालविणाऱ्या तसेच निराधार अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटूंबाच्या मदतीला राज्यातील अनेक सामाजिक एवं सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, राजकीय व्यक्तीही पुढे सरसावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज नेहमी म्हणायचे की, ‘नरपूजा नारायण पूजा’ या शिकवणी प्रमाणे निरंकारी विद्यमान ‘सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शाखेच्या अंतर्गत चास-कडेवाडी, चिंचोली कोकणे, गिरवली, घोडेगाव, साल, आमोंडी, गंगापूर, शिनोली, गोहे, राजे/गाडेवाडी, कोंढवळ, आडिवरे, आसाणे, आहुपे, उबेवाडी, राजपूर येथील ४७ हुन अधिक निराधार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू जसे की, बाजरी, साखर, तेल, मूग-तूर, मसूर-डाळ, मीठ, अंगाचे व कपडे धुण्याचे साबण, चहा पावडर सहित सर्व मसाले इ. पॅकेटचे वाटप करण्यात आले. जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी तत्पर असतात. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी देखील निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धाऊन गेले होते.

प्रशासन आणि डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले असून ‘सोशल डिस्टंसिंग’ कडे विशेष लक्ष देत स्वयंसेवकांनी स्वतः मास्क, हॅन्डग्लोज चा वापर करून या वस्तू आणि धान्याचे वाटप केले. हा एक जीवघेणा आजार आहे या आजारापासून दूर राहायचे असेल तर सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःला, परिवाराला व आपल्या शहराला या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करण्यासाठी प्रत्येकाने होम क्वारंटाईन द्वारे सहकार्य करावे असा सल्ला तसेच दानशूर व्यक्तींनीही या मानवतेच्या कार्यात सहभागी व्हावे अशी विनंती यावेळी घोडेगाव शाखेचे प्रमुख आ. अजित कोकणे यांनी केली.