‘ही’ लक्षणं अर्धवट ‘ज्ञानी’ माणसाची, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल ।।१।।

कोण यांचे मना आणी । ऐको कानीं नायकोनि ।।२।।

घरोघरी सांगती ज्ञान । भूस सीण कांडिती ।।३।।

तुका म्हणे आपुल्या मती । काय रिती पोकळ ।।४।।

अर्थ-

अर्धवट ज्ञानी लोक तथ्य नसलेल्या कोरड्या व चावट अशा गोष्टी बोलतात. जो शिकलेला असतो, त्याला शहाणपण शिकवतात परंतु त्यांच्या स्वतःच्या बुद्धीत ज्ञानाचा काहीही ओलावा नसतो…!!

अशांचे बोलणे कोण मनावर घेईल ? उलट लोक त्यांचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात…!!

अर्धवट ज्ञान असलेले हे लोक घरोघरी जाऊन लोकांना वेगवेगळे उपदेश करतात. परंतु त्यांना अनुभवाचा पत्ता नसल्यामुळे ते केवळ शब्दांचे भूस कांडतात. त्यात ज्ञानरुपी धान्य नसते…!!

तुकोबा म्हणतात, असे हे स्वतःच्याच बुद्धीने स्वतःची मते तयार करणारे लोक आतून मात्र पोकळ असतात…!!