देवाच्या, संतांच्या नावावरून मुलांचे नाव का ठेवतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

ईश्वराची भक्ती करणारा मनुष्य दुराचारी असला तरीही तो देवाला प्रिय असतो, हे सत्य तुकोबांनी प्रस्तुत अभंगाद्वारे एका पुराणकथेचा दाखला देऊन सांगितले आहे.

व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी ।
विश्वास तिचे मनी राघोबाचा ।।१।।

ऐसीही पापिणी वाहिली विमानी ।
अचळ भुवनी ठेवियेली ।।२।।

पतितपावन तीही लोकी ठसा ।
कृपाळू कोंवसा अनाथांचा ।।३।।

तुका म्हणे धरा विठोबाची सोय ।
आणिक उपाय नेणो किती ।।४।।

अर्थ-

तुकोबा म्हणतात, गणिका नावाची एक वेश्या होती. तिच्याकडे असलेल्या पोपटाला तिने ‘राघोबा’ असे नाव ठेवले होते. त्याच्यावरील अतिशय प्रेमामुळे ती त्याला राघोबा राघोबा अशा नावाने वारंवार हाक मारत असे.

(रघूचा वंशज म्हणून राघव हे श्रीरामांचे नाव प्रसिद्ध असल्याने एकप्रकारे पोपटाला राघोबा म्हणताना तिच्याकडून रामनामाचा अनेकदा उच्चार झाला.) अशा त्या गणिकेची भक्ती पाहून देवाने तिला अंतकाळी नेण्यासाठी विमान पाठवले आणि तिला वैकुंठात अढळस्थानी बसवले.

नुसते नामस्मरण केल्याने देखील देव भक्ताला सायुज्य मुक्तीचा अधिकारी बनवतो. त्याच्या अशा स्वभावामुळे त्याची कृपाळू ह्या नावाने कीर्ती पसरलेली आहे.

तुकोबा म्हणतात, देव कोणत्या मार्गाने आपल्याला मुक्ती मिळवून देईल ते सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सगळे एका विठ्ठलाचाच छंद धरा.

– संत सेवक