संपत्तीचा ‘गर्व’ कधीच नसावा, सोन्याच्या लंकेचा ‘लंकेश्वर’ देखील शेवटी रिकाम्या हातानेच गेला

पोलीसनामा ऑनलाइन –

पाषाण परिस भूमि जांबूनद | वंशाचा संबंध धातयाचा ||१|| सोनियाची पुरी समुद्राचा वेढा | समुदाय गाढा राक्षसांचा ||२|| ऐंशी सहस्त्र ज्या सुदरा कामिनी | माजी मुखराणी मंदोदरी ||३|| पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी | मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि ||४|| चौदा चौकडीया आयुष्यगणना | बंधुवर्ग जाणा गे कुंभकर्ण ||५|| तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी | सांगातें कवडी गेली नाही ||६||

जगद्गुरू तुकोबाराय या अभंगात रावणाच्या वैभवाचे वर्णन करतात, ज्या लंकेत परिसाचे दगड होते, भूमी सोन्याची होती; त्या सुवर्णनगरीभोवती समुद्राचा वेढा होता. आणि राक्षसांचा मोठा समुदाय होता. ८० हजार सुंदर स्त्रिया होत्या, व त्यात मुख्य मंदोदरी होती. रावणाचे मुलं, नातवंडं तर असंख्य होते. त्यात मुख्य जो जेष्ठ पुत्र मेघनाद होता त्याने इंद्राला जिंकल्यामुळे त्याचे नाव इंद्रजित पडले. चार युगे मिळून एक चोकडी अशा चौदा चौकड्याचे दिर्घ आयुष्य रावणाला होते. तसेच कुंभकर्णासारखा भाऊ त्याचा पाठिराखा होता. ३३ कोटी देव त्या रावणाने बंदीत ठेवले होते. एवढे सगळे वैभव असून तो शेवटी एकटाच गेला. एक कवडीसुद्धा त्याच्याबरोबर गेली नाही. (ऐहिक वैभवाच्या मागे लागू नये असे तुकोबारायांचे सांगणे आहे.

विचार करा… रावणाची संपत्ती आणि आपल्या संपत्तीची तुलना करा. एवढी संपत्ती, वैभव असूनही रावणाला एक कवडीही सोबत नेता आली नाही. आपणतरी काय घेऊन जाणार आहोत ? म्हणून संपत्तीचा कधीच गर्व करू नका. जोपर्यंत हातात सत्ता आहे तोपर्यंत गरजूंना मदत करा. आणि अखंड भगवंताचे नामस्मरण करत राहा.
– संत सेवक