माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

असुरी स्वभाव निर्भय अंतर | मानसीं निष्ठुर अतिवादी ||१|| याति कुळ येथे असे अप्रमाण | गुणाचे कारण असे अंगी ||२|| काळे कुट पितळ सोने शुद्ध रंग | अंगाचेच अंग साक्षी देते ||३|| तुका म्हणे बरी जातीसवे भेटी | नवनीत पोटी साठविले ||४||

जगद्गुरु तुकोबाराय या अंभंगात मनुष्यांच्या विविध गुणदोषांचे निरीक्षण करुन म्हणतात की, ज्या माणसाचा स्वभाव तमोगुणी आहे, अंत:करण कठोर आहे, इतरांबाबत ज्याच्या मनात प्रेमभाव नाही. अशाच्या बाबतीत तो चांगल्या जातीचा आहे, चांगल्या गुणाचा आहे हा विचार व्यर्थ समजावा. त्याच्या अंगी कोणते गुण आहेत यावरुन तो चांगला आहे की वाईट आहे हे समजावे असे तुकोबाराय म्हणतात.

तुकोबाराय एक उदाहरण देऊन सांगतात की, सोने आणि पितळ या दोन्हींचाही रंग हा पिवळाच आहे. पितळ कलंकित होते मात्र सोने कधिच कलंकित होत नाही ते निरंतर शुद्धच असते. त्याप्रमाणे गुणानूसार माणूस वेगवेगळा ठरतो. लोकांमध्ये सद्गुण-दुर्गुण भेद आहे, हे लक्षात घेऊन तुकोबाराय अशी इच्छा प्रकट करतात की, हरिविषयाचा नवनीतासारखा मृदू आणि सारभूत भाव ज्याच्या अंत:करणात आहे, अशा जातिवंत संतांची आणि माझी भेट व्हावी.