डॉ. संतोष पोळची येरवडा कारागृहात रवानगी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन- बनावट पिस्तुलाचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करणारा कळंबा कारागृहातील कच्चा कैदी डॉ. संतोष पोळ याची प्रशासनाने पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, कारागृहात त्याला मोबाईल कोणी पुरवला, याची कसून चौकशी सुरू असून नवनियुक्त १० कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे. ते दोषी आढळले तर कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथील डॉ. संतोष पोळ याच्यावर सहा खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मालमत्ता, सोन्याचे दागिने यासाठीच त्याने गुंगीचे इंजेक्शन देऊन महिलांचे खून केले आहेत.

या गुन्ह्यात ३० सप्टेंबर, २०१८ पासून तो कळंबा कारागृहात कच्चा कैदी म्हणून बंदिस्त आहे. सध्या त्याच्या खटल्याच्या न्यायालयीन तारखा सुरू आहेत. डॉ. संतोष पोळ याने कारागृहात कागदी पुठ्ठे, साबण, फेव्हिकॉल, पाईपच्या साहाय्याने बनावट पिस्तूल तयार केले. अनधिकृतपणे मोबाईल आत मागवून त्याद्वारे कारागृहातील व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे भासवले. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली होती. कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कसून चौकशी सुरू केल्यानंतर पोळ याने केलेला बनाव उघड झाला.

गुन्हे शाखेच्या सहायक फाैजदार, कर्मचाऱ्यांवर खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल

डॉ. संतोष पोळ याने येरवडा कारागृहात जाण्यापूर्वी अधीक्षक शरद शेळके यांची भेट घेऊन माफी मागितली. कारागृहातील एकाही अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी असे कृत्य मी केलेले नाही. माफीचा साक्षीदार ठरलेल्या ज्योती मांडरे यांच्या अडचणी वाढवण्यासाठीच तसा प्रकार केला, असे त्याने सांगितले आहे. मला त्याचा पश्चात्ताप होतोय, असे तो म्हणाला. मोबाईल कोणी दिला, याचे स्पष्टीकरण देण्यास त्याने नकार दिला. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कारागृहातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली. प्रत्येकाचे जाबजबाब नोंदवले. त्यांचे रजिस्टर चेक केले. यामध्ये नवनियुक्त १० कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटतात. त्यांच्याकडेच कसून चौकशी सुरू असून, चौकशीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.