काश्मीरी नागरिकांना हवेत सामान्य नागरिकांसारखे ‘अधिकार’, फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आणि सचिन पायलट यांची पत्नी सारानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील सर्व काश्मिरींना देशातील इतर नागरिकांसारखे समान हक्क असले पाहिजेत, असे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची बहिण सारा अब्दुल्ला पायलट यांनी शुक्रवारी म्हटले आहे. सार्वजनिक सुरक्षा अधिनियम (पीएसए) अंतर्गत उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेतल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होती. सुनावणी झाल्यानंतर सारा अब्दुल्ला पायलट पत्रकारांशी बोलत होत्या.

सारा अब्दुल्ला यांनी सांगितले की, माझा आणि आमच्या कुटुंबाचा न्यायालयीन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाची लकरच सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही येथे आहोत याचे कारण आम्हाला सर्व काश्मिरींना समान अधिकार मिळावेत असे वाटते. भारतातील इतर सर्व नागरिकांना ज्या प्रमाणे हक्क आहेत त्यांच्या समान काश्मिरींना देखील समान हक्क असले पाहिजेत. आणि आम्ही त्या दिवसाची वाट पहात असल्याचे सारा यांनी सांगितले.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू – काश्मीर प्रशासनाला उमर अब्दुल्ला यांच्या अटके विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.