शारदा चिट फण्ड घोटाळा : माजी सीआयडी अतिरिक्त महासंचालक राजीव कुमारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता उच्च न्यायालयाने सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक राजीव कुमार यांच्या अटकेपासून संरक्षण मागे घेतल्यानंतर आठवड्याभरातच अलिपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला. शनिवारी सीबीआयने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांना “फरार” घोषित केले.

सीबीआयने कुमार यांना कोर्टात फरार घोषित केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुजय सेनगुप्ता यांनी सीबीआयने कोणत्या तारखांना समन्स बजावले होते व त्या तारखांना एजन्सीसमोर हजर केले असल्यास त्यांची यादी मागविली. सुमारे १०० मिनिटांपर्यंत सुनावणी घेतल्यानंर न्यायाधीशांनी कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला.

शनिवारी कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयचे वकील काली चरण मिश्रा यांनी माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या प्रकरणाशी समांतर चर्चा केली ज्यात सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या महिन्याच्या सुरुवातीला कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि असेही निदर्शनास आले होते की सुरुवातीच्या टप्प्यावर अटकपूर्व जामीन मिळाल्यास तपासात अडचण येऊ शकते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश अलिपूर यांच्या न्यायालयात हजर राहून कुमार यांचे वकील देबाशिस रॉय यांनी युक्तिवाद केला की शिलॉंग चौकशीचे व्हिडिओ फुटेज सीबीआय अद्याप सादर करू शकले नाहीत. “त्यांनी दावा केला आहे की कुमार यांनी सीबीआयला सहकार्य केले नाही. परंतु एजन्सी अद्याप व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्टात सादर करू शकली नाही, ” असे रॉय म्हणाले. त्यांनी असा युक्तिवाद केला की कुमार यांनी १-२५ सप्टेंबर २०१९ दरम्यान त्याच्या अनुपस्थितीबद्दल सीबीआयला कळविले होते. आणि आवश्यकता असल्यास बोलावण्यात यावे असेही सांगितले होते.

कुमार यांचा शोध सुरूच :
सीबीआय राजीव यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि त्यांनी राज्य अधिकाऱ्यांना याबाबतीत अनेक वेळा पत्र लिहिले आहे. राजीव हे २५ सप्टेंबरपर्यंत रजेवर आहेत आणि दूरध्वनीवर संपर्क साधू शकत नाहीत, अशी माहिती माहिती राज्याच्या DGP नी दिली. कुमार यांचा पत्ता शोधण्यासाठी सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकांनी भवानी भवन येथील सीआयडीचे कार्यालय, खासगी रुग्णालय आणि त्यांचे अधिकृत निवासस्थान आणि शहरातील विविध भागांना भेट दिली.

राजीव कुमार यांच्यावरील आरोप :
शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने राजीव कुमार यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर अनेक नोटीस बजावल्या आहेत. परंतु कोलकाताच्या या माजी पोलिस आयुक्तांनी समन्सला उत्तर दिले नाही. शारदा चिट फंड प्रकरणात कुमार यांनी गंभीर पुराव्यांसह छेडछाड केल्याचा आरोप आहे. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण आणि घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले होते त्यांनी त्याचे नेतृत्व केले.

You might also like