अकोला : सराफ असोशिएशनच्या अध्यक्षांनी केली चोरीच्या दागिन्यांची ‘खरेदी’

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांकडून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या एखाद्या सराफाला पोलिसांनी पकडले की, लगेच सर्व सराफ गोळा होऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. अकोल्यातही असेच सर्व सराफ एकत्र झाले. त्यांनी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी आपल्या खाक्या वापरताच असोशिएशनच्या अध्यक्षांनी कबुली देऊन ९० ग्रॅमचे दागिने काढून दिले. त्यामुळे पोलिसांवर आरोप करणाऱ्या सराफांची मात्र चांगलीच गोची झाली. राजू वर्मा असे या सराफ असोशिएशनच्या अध्यक्षाचे नाव आहे.

अकोला शहरात तीन ठिकाणी घरफोड्या होऊन १० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या घरफोडींचा तपास करताना खदान पोलिसांनी नदीम बेग कलीम बेग आणि रिजवान अब्दुल खालीद या दोघा चोरट्यांना अटक केली. त्यांनी आतापर्यंत तीन घरफोड्यांची कबुली दिली असून चोरीतील रोख १ लाख रुपये, दुचाकी व १२ हजार रुपयांची चांदी पोलिसांनी जप्त केली होती. त्यातील दागिन्यांची चौकशी करता त्यांनी राजू वर्मा यांना ९० ग्रॅमचे दागिने विकल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी राजू वर्मा याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. हे समजताच अकोला शहरातील सर्व सराफ एकत्र झाले. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. पोलिसांवरच आरोप केले जाऊ लागले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पोलिसांची चौकशी सुरु केली. पण पोलिसांनी पुरावाच राजू वर्मा व सराफांसमोर दाखविल्यावर वर्मा पोलिसांची माफी मागू लागला. त्याने चोरीचे सोने विकत घेतल्याची कबुली देऊन ते सोने काढून पोलिसांच्या हवाली केले. त्यामुळे अध्यक्षाच्या समर्थनार्थ पोलिसांवर आरोप करणाऱ्या सराफ असोशिएशनचे सदस्य मात्र तोंडघशी पडले.

Visit : Policenama.com