सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमण महापालिकेकडून ‘जमीनदोस्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सारसबाग चौपाटीवरील दुकानांपुढे असलेली अतिक्रमणे आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली. एवढेच नव्हे तर याठिकाणी असलेल्या पाळणा व्यावसायिक, घोडेवाले यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून याठिकाणी व्यवसायास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

सारसबाग येथील चौपाटीवर महापालिकेच्या परवानगी असलेले खाद्यपदार्थ विक्रिचे ५२ स्टॉल्स आहेत. परंतू येथील व्यावसायिक स्टॉलसमोरील रस्त्यावर तात्पुरते शेड्स उभारून तेथे टेबल-खुर्च्या मांडत असतात. तर समोरील बाजूस लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणेही रस्त्यातच उभारलेले असतात. याच ठिकाणी संध्याकाळी घोड्यांची रपेट मारणारे व्यावसायिकही आहेत. या सर्व गोष्टींमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. यापुर्वीही येथील व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. परंतू पुन्हा पुन्हा अतिक्रमण होत असल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासूनच पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

मंडई येथे सध्या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी गोटीराम भैय्या चौकाजवळील जागेत हे काम सुरू आहे. गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पथारीवाले, हातगाडीवाले यांचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतुक कोंडीत भर पडत चालली आहे. याठिकाणी शुक्रवारी सकाळी कारवाई केली गेली. ही कारवाई सातत्याने केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे.

Visit : Policenama.com