सारसबागेतील  गणपतीला देखील हुडहुडी… घातले स्वेटर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या महाराष्ट्रातच थंडीचा कडाका चांगलाच वाढतो आहे. पुण्यात देखील गेल्या दोन  दिवसांपासून पारा ८ डिग्री सेंटीग्रेडवर गेला आहे. ही कडाक्याची थंड पुणेकरांच्या सारसबागेतील लाडक्या गणपतीला देखील जाणवते आहे म्हणूनच आज गणपतीला स्वेटर घालण्यात आला. विशेष म्हणजे या स्वेटरमध्ये गणपती  आणखीनच सुंदर दिसते आहे. या स्वेटर मधल्या गणपतीचे अनेक भक्त दर्शन घेत आहेत.

पुण्यातील सारसबाग आणि तेथिल गणपती 
सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता.श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते.

त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘ सारस बाग ‘ असे नामकरण केले.

श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.