आमचा पक्षच ‘पितृ’ पक्ष , मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचं बिगुल वाजल्यापासून राज्यात भाजप-सेना युतीला घेऊन चर्चा होताना दिसत आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे युती कधी होणार ? अशी चर्चाही आहे की, ही युती पितृपक्षामुळे रखडली आहे. अशात युतीच्या घोषणेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला यावर उद्धव यांनी खूपच मिश्किल उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांचे हे उत्तर सरकॅझमची उच्च पातळी गाठणारं आहे असंही बोललं जात आहे. याचे वेगळे अर्थ काढल्याचेही समोर येत आहे.

आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता. सर्व नेते पाटील यांच्या घरी पोहोचले. सर्वांनी जेवण केले. यानंतर उद्धव ठाकरे हात धुवायला गेले. यावेळी फडणवीसांनी गंमतीने त्यांना विचारलं की, “उद्धवजी पितृपक्षाची काही अडचण नाही ना ?” या प्रश्नावर उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, “देवेंद्रजी मुळात आमचा पक्ष हा ‘पितृ’ पक्ष आहे. उद्धव यांचं उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उद्धव ठाकरे यांच्या विधानाचे दोन अर्थ काढले जात आहे. पहिला असा की, शिवसेना हा उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे. म्हणून उद्धव यांनी शिवसेनेला पितृपक्ष म्हटले. दुसरा अर्थ असा की, शिवसेना भाजपच्या युतीत शिवसेना हा पक्ष पित्यासमान आहे असं ठाकरेंना सुचवायचं आहे.