‘सर्व लाईन व्यस्त आहेत….. ‘टीझर पाहिलात का ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – अनेकदा आपण कोणाला तरी काॅल करतो आणि एका बाईच्या आवाजात आपल्याला एक रेकाॅर्डेड व्हाईस ऐकायला मिळतो. तो म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत….. ‘इतकंच नाही तर सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडलं असल्याचंही दिसत आहे. आता महत्त्वाची बाब अशी की, याच नावाचा एक सिनेमा येत आहे आणि या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं शीर्षक पाहता  शीर्षकावरून आणि टीजरवरून हा सिनेमा धमाल कॉमेडी असणार हे तर सिद्धच होत आहे. चित्रपटाचं नाव जरी सर्व लाईन व्यस्त आहेत, असं असलं तरी यातली ‘लाईन’ जरा भलतीच दिसतेय आणि ती व्यस्त का आहे? हे सिनेमा पाहिल्यावरच समजणार आहे.

स्टेलारीया स्टुडीयो निर्मित, अमोल उतेकर प्रस्तुत आणि प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत हा धमाल चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, नीथा शेट्टी आणि राणी अगरवाल असे कॉमेडीचे हुकुमी एक्के असलेली मंडळी नव्या वर्षाचा नवा धमाका घेऊन येत आहेत.

टीझर पाहता असं लक्षात येतं की, महेश मांजरेकर या सिनेमात एकदम वेगळ्या भूमिकेत आहेत. एका कलंदर साधूबुवाची भूमिका त्यांनी साकारली आहे. या कलंदर साधूबुवाच्या अवतीभवती भक्तगण असल्याचंही दिसत आहे. फुल टु विनोदी असलेल्या या सिनेमात सिद्धार्थ जाधवनंही धमाल केलीय. प्रेम, लग्न यांच्याभोवती हा सिनेमा फिरताना दिसत आहे.

दरम्यान सिद्धार्थचे दोन सिनेमे हे  डिसेंबरमध्ये रिलीज होत आहेत त्यामुळे या वर्षी सिद्धार्थची डबल ट्रिट आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे या वर्षाची सुरुवात सिद्धूची येरे येरे पैसा सिनेमानं झाली होती. आणि आता वर्ष संपणार ते दोन मोठ्या सिनेमानं. महत्त्वाचं म्हणजे येरे येरे पैसा रोमँटिक काॅमेडी होता. सिद्धार्थ जाधवनं त्या सिनेमात खूप धमाल केली होती. आता तो आणखी धमाल करायला येतोय, पण बाॅलिवूड सिनेमातून.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने रणवीर आणि त्याचा फोटो ट्विटही केला होता. त्यामुळे सिद्धार्थ जाधव रणवीर सिंगसोबत ‘सिंबा’ सिनेमात काम करतो आहे स्पष्टच आहे. इतकेच नाही तर सिद्धार्थ जाधवला आम्ही या सिनेमाबद्दल विचारलं असता . ‘या सिनेमात मी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय. पण रोहित सरांनी अजून काही बोलायला परवानगी दिलेली नाही’ असं उत्तर सिद्धार्थ जाधवने दिलं होतं.