सासवड-जेजुरी रस्त्यावरील पुलाला मोठं भगदाड, बारामतीशी संपर्क तुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे बारामती रस्त्यावरील सासवडहून जेजुरीकडे जाणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने काल रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे बारामतीकडे जाणारा हा जवळचा रस्ता बंद झाल्याने बारामतीशी संपर्क तुटला आहे.

पुणे बारामतीदरम्यान दररोज हजारो वाहने ये जा करत असतात काल झालेल्या तुफान पावसाने सासवड गावातून जेजुरीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीजवळील पुलाचा मोठा भाग तुटून पडला असून भगदाड पडले आहे. पुणे बारामती मार्गे पंढरपूरला जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. रात्री इतका प्रचंड जोराने पाऊस पडला की, रात्री साडेअकरा वाजल्यानंतर कऱ्हा नदीच्या या मुख्य पुलावरुन पाणी वाहत होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पुल खचला आहे.

त्यामुळे आता बारामतीमार्गे पंढरपूरला जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. बारामतीला जाण्यासाठी आता पुणे सोलापूर महामार्गावरील पाटसमार्गे जाण्याचा एकमेव रस्ता उरला आहे. मात्र, हा रस्ता अतिशय लहान असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतात. त्याशिवाय या मार्गावरील रोटी घाटही अवघड आहे. त्यामुळे बारामतीकडे जाणारी इतकी मोठी वाहतूक या रस्त्याने वळवावी लागणार असून लोकांना लांबचा वळसा पडणार आहे. पाटसमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक वळणार असून त्यामुळे येथील रस्त्यावर मोठा ताण येणार आहे.

बारामती पुणे व पुणे बारामती दरम्यान दररोज हजारो लोक काम व व्यावसायानिमित्त ये जा करीत असतात. त्यांना हा जवळचा मार्ग होता. या सर्वांना आता पुलाची दुरुस्ती होईपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.

Visit : policenama.com

Loading...
You might also like