सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – लाखनी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शितल अशोक फालके (वय २८) असे या महिला अधिकार्‍यांचे नाव आहे. त्या मुळच्या सातारा येथील रहिवासी होत्या. त्या अविवाहित असून आपल्या आईसमवेत लाखनी येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने रहात होत्या. त्या ३० जून २०१७ पासून लाखनी येथे कार्यरत होत्या.

शनिवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईला बाथरुममध्ये त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती तात्काळ लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरात शोध घेतल्यावर त्यांना एक सुसाईट चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी आपण स्वत:च्या मर्जीने आत्महत्या करत असून आई मला माफ कर असे लिहिलेले आहे.

मृदु आणि प्रेमळ स्वभावाच्या शितल कर्मचार्‍यांमध्ये प्रिय होत्या. शितल फाळके या गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्याबरोबर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे काही जणांनी पाहिले होते. मात्र, त्यामागील कारण त्यांनी कोणाला सांगितले नव्हते. त्यानंतर आज सकाळी सर्वांना त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यावर कर्मचार्‍यांना धक्का बसला.