Lockdown Again : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 17 जुलैपासून ‘लॉकडाऊन’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनासमोरील चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. आता सातारा जिल्ह्यात देखील 17 ते 26 जुलै या कालावधीत कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 पासून 26 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, अशी भावना विविध स्तरावर व्यक्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र 17 जुलै पासूनचा लॉकडाऊन कडक असणार आहे. यामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन शिथील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, प्रतिबिंधीत क्षेत्रांमध्ये सरकारच्या निर्देशानुसार, कठोर अंमलबजावणी करावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

17 जुलै ते 26 जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत 22 जुलैनंतर शिथीलता देण्यात येणार आहे. त्यानुसार 26 जुलै पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी अस्थापने व त्यांचे ठोक विक्रते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.