काँग्रेसला मोठा धक्का ; आणखी एक नेता भाजपच्या गळाला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांना बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ते सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय विखे,  रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपाबरोबर जोडलं जाणार आहे.

माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी नंतर माघार घेतली. यामुळे या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती. मात्र, त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते. भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. माढ्यामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे.