दीड कोटीच्या ‘विम्या’साठी मित्राला गाडीसह ‘जाळलं’, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – दीड कोटीच्या विम्यासाठी एका व्यक्तीसह स्विफ्ट गाडी जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आली आहे. ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी सुमित मोरे याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील बोधेवाडी घाटात कार आणि मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमध्ये सुमित मोरे या व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सुमित मोरे यानेच हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. सुमित मोरे याने आपला मित्र तानाजी आवळेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

दोन दिवसांपूर्वी उकिर्डे घाटात पोलिसांना संपूर्ण जळालेली गाडी आढळून आली होती. या गाडीत स्टेअरींगवर जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी गाडीच्या चेसीनंबरवरून गाडी मालकाचा शोध घेतला. त्यानुसार घरातील लोकांना बोलवून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर हा मृतदेह मोरे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गाडीने पेट घेतल्याने गाडी चालकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

कर्जासाठी दीड कोटीचा उतरवला विमा
सुमित मोहे हा मुळचा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महिमानगड येथील आहे. तो आपल्या आई-वडिल यांच्यासोबत सायन भागातील काळा किल्ली परिसरात वास्तव्यास आहे. व्यायामावेळी लागणारी प्रोटिन पावडर बनवण्याचा त्याचा व्यवसाय असून या व्यावसायामुळे त्याला 50 लाखांचे कर्ज झाले होते. त्यासाठी त्याने मुंबईत आयसीआयसीआय कंपनीचा दीड कोटी रुपयांचा विमा उतरवला होता.
खोट्या मृत्यूची माहिती कुटुंबाला दिली

कर्ज फेडण्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला होता. त्याने आपण मेलो तर दीड कोटी मिळतील, मग जर माझ्या मृत्यूचा दाखला तयार केला तर याच उद्देशाने त्याने प्लॅन केला. याची माहिती त्याने आई वडिल आणि दोन भावांना दिली होती. त्यानुसार त्याने 20 जानेवारी रोजी तो मुंबईहुन साताऱ्यात आला. त्याने तानाजी आवळेला महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले.

मित्राला स्वत:चे कपडे दिले
आरोपी सुमित हा तानाजीला घेऊन स्वत: च्या गाडीतून घेऊन गेला. त्यावेळी त्याने तानाजीला तुझे कपडे खराब झाल्याचे सांगून त्याला स्वत:चे कपडे घालण्यास दिले. एका निर्जण स्थळी गाडी थांबवून त्याने तानाजीच्या डोक्यात स्टंपने मारून त्याला बेशुद्ध करुन गाडीतून बुधघाटात आणले. त्याठिकाणी तानाजीला स्टेरींगवर बसवून गाडीवर आणि तानाजीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

सर्व प्लॅन प्रमाणे घडले, मात्र…
पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडी आणि गाडीत मृतदेह आढळून आल्यानंतर गाडीच्या चेसीनंबरवरून मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता हा बनाव असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सुमीतला अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे वडिल, दोन भाऊ आणि फलटण मधील एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like